राजाभाऊ परांजपेंसारख्या गुरुमुळेच अभिनयाचा प्रवास सुखकर झाला – सीमा देव

unnamed (2)

 

पुणे : ”राजाभाऊ परांजपे यांच्यासारखे गुरू मिळाल्यामुळे मला खूप काही शिकायला मिळाले आणि त्यामुळे माझा अभिनयाचा प्रवास केवळ सुखकरच झाला  नाही तर त्यामुळेच मला नाव आणि कीर्तीही मिळाली”, अशा शब्दात सुप्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांनी आपल्या अभिनय कलेचा प्रवास सांगताना आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

पंधराव्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या गुरुवारी झालेल्या उदघाटन समारंभात अभिनेत्री सीमा देव यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, त्यानिमित्त आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या अभिनयकलेचा जीवनपट उलगडून दाखविला. आज सीमा आणि रमेश देव यांच्या हस्ते पिफ अंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘पिफ बझार’चे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल, ‘पीफ बझार’चे समन्वयक श्रीरंग गोडबोले आणि अभिनेते रमेश देव उपस्थित होते. 

‘सुवासिनी’ , ‘जगाच्या पाठीवर’ या आपल्या त्याकाळी प्रचंड गाजलेल्या चित्रपटांचे अनुभव सांगताना सीमा देव यांनी राजाभाऊ परांजपे यांच्यासारखे गुरू मिळणे हे आपले भाग्यच होते असे सांगितले. कारण इतक्या बारीकसारीक गोष्टी ते समजावून सांगायचे की राजाभाऊंसमोर ‘मला जमत नाही’ असे म्हणणे फारच अवघड होऊन बसायचे. त्यांनी घेतलेल्या अभिनयाच्या ‘तालमी’ मुळेच माझा अभिनय परिपूर्ण झाला आणि मराठीप्रमाणे हिंदीतही मला अनेक चित्रपटांत कामे मिळाली, असे त्यांनी सांगितले. राजाभाऊंप्रमाणेच राजा ठाकूर आणि मधुकर उर्फ बाबा पाठक या ‘आदर्श ‘ दिग्दर्शकांचाही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. 

मराठी प्रमाणेच हिंदी चित्रपटातही काम करताना अनेक दिग्गज दिग्दर्शक आणि नामवंत कलाकारांमुळे आपला अभिनय समृद्ध होत गेला असे सांगताना त्या म्हणाल्या, संजीव कुमार सारख्या संवेदनशील अभिनेत्याबरोबर काम करताना मला सुरुवातीला अवघड वाटले होते मात्र जेंव्हा त्याने आपणहून ‘मी तुमचा ‘फैन’ आहे असे सांगितले तेव्हा मला खूप हायसे वाटले. राजेश खन्ना देखील ‘गिरगाव’चा असल्याने त्यांच्याबरोबर अतिशय मोकळेपणाने मला काम करता आले, असे त्यांनी सांगितले. हल्लीचे मराठी चित्रपट नक्कीच आशयसंपन्न आहेत याबद्दल दुमत नाही. मात्र नवोदित मराठी तारकांनी हिंदीत जाताना पुरेशी तयारी करून जावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.  ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनीही याप्रसंगी सीमा देव यांच्याबरोबर जमलेले प्रेम आणि सहधर्मचारिणी होण्यापर्यंतचा प्रवास आपल्या मिश्कील शब्दांत कथन केला. तर रमेश देव यांचे नेहमीच चांगले सहकार्य लाभल्यामुळे ‘अभिमान’ चित्रपटातील प्रसंग आमच्या जीवनात कधीही येऊ शकले नाहीत असे सीमा देव यांनी यावेळी अभिमानाने सांगितले.