‘कोण होईल मराठी करोडपती’चा – पर्व ३ सोमवारपासून

s a

पुणे : महाराष्ट्रातील अनेक लोकांचा स्वप्नपूर्ती करणारा, आपल्या ज्ञानाने नशीब बदलण्याची सुवर्णसंधी देणारा मराठी टेलिव्हिजनवरील सर्वोत्तम महामंच म्हणजे कलर्स मराठीवरील ‘कोण होईल मराठी करोडपती’! याच्या तीसर्‍या पर्वाला ३ ऑक्टोबर पासून सुरवात होणार आहे, अशी माहीती व्हायाकॉम-१८ चे अनुज पोद्दार व अभिनेता स्वप्नील जोशी यांनी दिली.

मराठी टेलिव्हिजनच्या परिघातील लोकांचे आयुष्य क्षणात बदलणारा कलर्स मराठीचा अद्वितीय कार्यक्रम, ‘कोण होईल मराठी करोडपती’ बिग सिनर्जी निर्मित कार्यक्रमाचे तिसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी बक्षिसाची रक्कम तब्बल तीन कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे. अत्यंत आकर्षक अशा नव्या संकल्पना आणि उत्कंठेने काठोकाठ भरलेल्या आणि अत्यंत जादुई क्षणांनी सजलेल्या या विलोभनीय आणि जीवनात कधीतरीच घेऊन येत असलेल्या संधीचे सोन्यात रुपांतर करण्यार्‍या कार्यक्रमाची सुरुवात ३ ऑक्टोबर रोजी होत असून, दर सोमवार ते बुधवार रात्री ९ वाजता हा कार्यक्रम कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

याविषयी बोलताना, अनुज पोद्दार म्हणाले की, कलर्स मराठीने आजवर अतिशय अर्थपूर्ण आणि आशयसंपन्न असे कार्यक्रम दिले असून, त्याने समाजात सकारात्मक बदल घडण्यास मदत झाली आहे. पहिल्या दोन वर्षात कोण होईल मराठी करोडपती या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या जीवनात एक चांगला बदल घडवून आणला असून, मराठी मातृभाषा असलेल्या नागरिकांना मोठा आर्थिक फायदाही मिळवून दिला आहे. आजचा मराठी भाषक प्रेक्षक हा सातत्याने नव्याच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे. नवनव्या संकल्पना, ऊर्जेने भारलेले नवनवे कार्यक्रम, समकालीन व्यवहार आणि त्याला सांस्कृतिक जोड देत यशाची आणि सुखा- समाधानाची नवी शिखरे पादाक्रांत करण्यासही तो सज्ज आहे. म्हणूनच कोण होईल मराठी करोडपती – पर्व ३ च्या माध्यमातून आम्ही मराठी प्रेक्षकांना एक वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

नेहमीच नाविन्याचा शोध घेत असताना कलर्स मराठीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असून, कोण होईल मराठी करोडपती – पर्व 3च्या नव्या स्वरुपामध्ये जगात प्रथमच सोशल एंगेजमेंट चॅट लाईफलाईन होऊ दे चर्चा याची सुरुवात केली आहे. या समकालीन आणि अत्यंत नाविन्यपूर्ण लाईफलाईनमुळे या कार्यक्रमातला प्रेक्षकांचा सहभाग आणि उत्कंठा, हे दोन्ही ही वाढणार आहे. आत्मविश्वास आणि दृढ निश्चय याबरोबर स्पर्धकांसाठी असणार आहे तीन लाईफलाईन्स म्हणजेच आधार कार्डस – ज्या आहेत ‘मितवा, डबल धमाका आणि चॅट लाईफलाईन – होऊ दे चर्चा यामुळे स्पर्धकांना त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करता येऊ शकेल आणि त्यांच्यासाठी असीम आनंदाचे दरवाजे नक्कीच उघडतील, असा आशावाद पोतदार यांनी व्यक्त केला आहे.