नाट्यवाडाच्या पाझर एकांकिकेने पटकाविला दाजीकाका गाडगीळ करंडक

gadgil

पुणे : मराठवाड्यातील नाट्यवाडा संस्थेने सादर केलेल्या पाझर या एकांकिकेला दाजीकाका गाडगीळ करंडक स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले. पीएनजी ज्वेलर्स तर्फे आयोजित दाजीकाका गाडगीळ करंडक या हिंदी व मराठी भाषेतील राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीची अंतिम फेरी काल पुण्यात घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे पार पडली. दुसरा क्रमांक सप महाविद्यालय, पुणे यांनी सादर केलेल्या ३०० मिसिंग व तिसरा क्रमांक पीआयसीटी महाविद्यालय, पुणे यांनी सादर केलेल्या अवडंबर या एकांकिकेने पटकाविला.

पुरस्कार वितरण समारंभाला लोकप्रिय अभिनेते सचिन खेडेकर, पीएन गाडगीळ ज्वेलर्स चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ, कार्यकारी संचालक पराग गाडगीळ, स्पर्धेचे संयोजक अजय नाईक व शार्दुल मोहिते तसेच परीक्षक किरण यज्ञोपवीत, प्रदीप वैद्द्य, प्रवीण तरडे, समीर विद्वंस, पौर्णिमा मनोहर आदी उपस्थित होते.

विजेत्या संघाला 31 हजार रुपये, फिरता करंडक व मानचिन्ह, दुसर्‍या क्रमांकाला 21 हजार व मानचिन्ह आणि तृतीय क्रमांकाला 11 हजार व मानचिन्ह देण्यात आले. उत्तेजनार्थ पुरस्कार सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांनी सादर केलेल्या पाहुणा व पारनेर येथील नाट्यप्रेमी प्रतिष्ठान यांनी सादर केलेल्या खटारा या एकांकिकांना देण्यात आला.

या स्पर्धेला महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे, मुंबई, अहमदनगर, सांगली, नागपूर व गोवा यासह संपूर्ण राज्यातून 72 संघांनी सहभाग घेतला होता. प्राथमिक फेरी 5 केंद्रांवर घेण्यात आली व त्यातून अंतिम फेरीसाठी 12 एकांकिकांची निवड करण्यात आली.

सचिन खेडेकर यावेळी म्हणाले की, एकांकिका सादर करणार्‍या तरुणांमधील उर्जा व गुण पाहून आनंद होतो. याचा जर चांगल्या गोष्टींसाठी उपयोग केला तर त्याचा आनंद आयुष्यभर मिळतो.

पीएन गाडगीळ ज्वेलर्स चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले की, दाजीकाकांना नाटकाची फार आवड होती आणि या उपक्रमाच्या पहिल्या सत्रातच फक्त प्रतिसादच नव्हे तर चांगल्या गुणवत्तेची नाटके देखील पाहायला मिळाली, याचा आम्हा सर्वांना आनंद आहे.