आता लक्ष्य तीन कोटी वृक्ष लागवडीचे : सुधीर मुनगंटीवार

mungantivar

राज्याचे सध्याच वनक्षेत्र हे 20 टक्के इतके आहे. राष्ट्रीय आणि राज्य वननीतीनुसार ते 33 टक्क्यांपर्यंत असायला हवे. त्यासाठी राज्यात 400 कोटी वृक्ष लागवड व्हायला हवी, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. हरित महाराष्ट्राच्या निर्मितीचा ध्यास घेऊन वनमंत्र्यांनी अनेक महत्वाकांक्षी पाऊलं टाकली आहेत. येत्या तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा त्यांचा संकल्प आहे. या ध्येयनिष्ठ वाटचालीबद्दल आपल्याशी संवाद साधत आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्यात 2019 पर्यंत 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आपण केला आहे. तो नेमका काय आहे?

राज्यात दि. 1 जुलै 2016 रोजी लोकसहभागातून एकाच दिवशी दोन कोटी 81 लाख वृक्ष लागवड झाली. आता येत्या 1 जुलै 2017 रोजी एकाच दिवशी तीन कोटी वृक्ष लागवडीचा विभागाचा संकल्प आहे. तर यासह 2019 पर्यंत राज्यात 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा आपला संकल्प आहे. झाडं लावतांना ती जगलीही पाहिजेत या गोष्टीला माझ्यादृष्टीने जास्त महत्व आहे. आता 1 जुलै 2017 रोजी आपले तीन कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य आहे. त्यानंतर 2018 मध्ये 10 कोटी आणि 2019 मध्ये 25 कोटी वृक्ष लागवडीचे वन विभागाचे उद्दिष्ट आहे. म्हणजे या तीन वर्षात वन विभागाकडून 38 कोटी झाडे लावली जातील. त्याशिवाय ग्रामपंचायतींना या प्रत्येक वर्षात अनुक्रमे 1,3 आणि 8 कोटी असे 12 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अशा पद्धतीने 2019 पर्यंत 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असणारी दर्जेदार रोपटी उपलब्ध व्हावीत म्हणून आपण गाव तिथे नर्सरी अशा पद्धतीने रोपवाटिका निर्मितीचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. रोप दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असावीत ती पुरेशी उंच वाढलेली असावीत, जेणे करून रोपे जगण्याचे प्रमाण किमान 80 ते 90 टक्के राहील याची ही आपण काळजी घेत आहोत.

आपण रोपवाटिकेमधील रोपांचा ताळेबंद ठेवायला सांगितला आहे. त्याबद्दल काय सांगाल?

संगणकीय आज्ञावलीद्वारे रोपांना ठराविक नंबर देऊन या रोपाची प्रजाती, त्याची निर्मिती आणि विक्री हा लेखा ठेवणे खुप गरजेचे आहे असे मला वाटते. त्यानुसार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अशी कार्यपद्धती विकसित केली जावी, अशा सूचना मी दिल्या आहेत. त्यामुळे रोपवाटिकांमध्ये किती रोपे तयार झाली, किती रोपांची विक्री झाली, त्याचा वापर कुठे झाला याचा तंतोतंत ताळेबंद ठेवणे शक्य होईल.
रूट ट्रेन टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने रोपे कमी कालावधीत तयार होऊ शकतात असे म्हटले जातं. परंतू या रोपांची गुणवत्ता, जगण्याचे प्रमाण यात तडजोड होता कामा नये ही बाब विचारात घेऊन या तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुढील आवश्यक ती कार्यवाही करून यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत.

50 कोटी वृक्ष लागवडीचे सुक्ष्म नियोजन आत्तापासूनच सुरु करण्यात आले आहे का?

हो, नक्कीच. यासाठी राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर समित्यांची स्थापना करण्यात येणार असून या 50 कोटी वृक्ष लागवडीत व्यापक लोकसहभाग मिळावा यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. यासाठी या कार्यक्रमाच्या सुक्ष्म नियोजनास आतापासूनच सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक स्तरावरील बैठकांमधील निर्णयांची माहिती तत्काळ मिळण्यासाठी रियल टाईम रिपोर्टिंग गरजेचे आहे असं मला वाटतं. त्याकरिता अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (माहिती व तंत्रज्ञान) नागपूर यांनी यासाठी आवश्यक असणारी आज्ञावली विकसित करून घ्यावी असे मी त्यांना सांगितले आहे. या बैठकांमध्ये घेतलेल्या निर्णयावर इतरांना आपली मते व अभिप्राय देणे शक्य व्हावे म्हणून वन विभागाच्या  www.mahaforest.nic.in संकेतस्थळावर एक प्लीकेशन विकसित करावे असे निर्देश ही मी दिले आहे. अशाप्रकारे चर्चा झाल्यास, विचारांचे आदानप्रदान झाल्यास नवीन माहिती, ज्ञान मिळणे तसेच अंमलबजावणीची प्रक्रिया सोपी होण्यास मदत होईल, येणार्‍या अडचणी चर्चेतून सोडवता येतील असं मला वाटतं.

विभागाचे संकेतस्थळ अद्ययावत करण्याबाबतही आपण आग्रही आहात
हो. वन विभागाच्या संकेतस्थळावर ई मॅगेझिन वाचण्याची सुविधा असावी, विभागांतर्गत यशकथा आणि नावीन्यपूर्ण संकल्पना या संकेतस्थळाच्या माध्यमातून लोकांना पाहता याव्यात अशी सुविधा वन विभागाने विकसित करावी असे मी विभागाला सांगितले आहे. वन विभागाचे संकेतस्थळ अतिशय आकर्षक व कल्पकतेने डिझाईन केलेले असावे, कोणत्या व्यक्तीने या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर किमान दोन ते अडीच तास तो याच संकेतस्थळावरील माहिती वाचण्यासाठी खिळून राहिला पाहिजे, अशा पद्धतीचे हे संकेतस्थळ असावे असं मला वाटतं. ते तसं करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

हरित सेनेचा विस्तार आपण करत आहात

लोकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं तर लोक उत्साहाने सामाजिक कार्यात सहभागी होतात हे दोन कोटी वृक्ष लागवडीने दाखवून दिले आहे. वन विकासाच्या कामात त्यांना सहभागी होण्याची संधी देणारं हरित सेनेसारखं सशक्त व्यासपीठ असावं, त्यात मोठ्याप्रमाणात लोकांनी स्वंयस्फुर्तीने सहभागी व्हावं ही आमची इच्छा आहे. यामध्ये प्रथमत: 10 लाख स्वंयसेवकांचा सहभाग आम्हाला अपेक्षित आहे. राज्यात सध्या 8800 शाळांमध्ये इको क्लब कार्यान्वित आहेत. यातील राष्ट्रीय हरित सेनेचे तसेच राज्याच्या 30 हजार शाळांमधील पर्यावरण रक्षक सेने चे विद्यार्थी नियोजित हरित सेनेमध्ये समाविष्ट करून घेता येतील, तसा प्रयत्न व्हावा, विभागीयपातळीवर राष्ट्रीय हरित सेना स्थापन व्हावी हा माझा प्रयत्न आहे.

आपल्या माणसाची स्मृती जपण्यासाठी आपण स्मृतीवन योजना पुनर्जीवित करत आहात का?

हो. आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ झाडं लावून त्याचे संगोपन करणे आणि कायमस्वरूपी आपल्या माणसाची स्मृती जपून ठेवणे या उद्देशाने ग्रामविकास विभागाने स्मृतीवन योजना कार्यान्वित केली होती. राज्याचे वनक्षेत्र सध्या 20 टक्के आहे ते राष्ट्रीय आणि राज्य वननीतीनुसार 33 टक्क्यांपर्यंत वाढवायचे असेल तर वन विकासाचे विविध कार्यक्रम व्यापक स्वरूपात हाती घेणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्मृतीवन योजना अक्षय वन या नावाने पुनर्जीवित करावी का किंवा तिचा समावेश सध्याच्या स्व. उत्तमराव पाटील वन उद्यानात करावा, याचा ही अभ्यास केला जावा अशा सूचना मी दिल्या आहेत.

पक्ष्यांसाठी वृक्ष ही नावीन्यपूर्ण संकल्पना आपण राबवित आहात. ही संकल्पना नेमकी काय आहे?

जलयुक्त शिवारच्या धर्तीवर वनयुक्त शिवार ही अभिनव योजना राबविण्याची संकल्पना पुढे आली. परिसर निसर्गरम्य आणि हिरवागार झाल्यास पर्यावरण समृद्ध गावे आपण निर्माण करू शकू. त्यासाठी गावस्तरावर उपलब्ध असलेल्या शासकीय, खाजगी आणि अशासकीय संस्थांच्या मालकीच्या वन आणि वनेतर जमीनीवर मोठ्याप्रमाणावर वृक्ष लागवड करण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. यात देशी आंबा, चिंच, आवळा यासारख्या झाडांबरोबर फळ-फुलं आणि इमारत लाकूड देणार्‍या झाडांचा समावेश असावा. विशेषत: ज्यातून पशुपक्ष्यांसाठी अधिवास निर्माण होईल, त्यांची नैसर्गिक अन्नसाखळी टिकून राहील अशा वृक्षांची लागवड व्हावी. त्यासाठी पक्ष्यांसाठी वृक्ष ही संकल्पना प्रत्यक्षात कशी आणता येईल याचा सखोल अभ्यास करून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा अशा सूचना मी विभागाला दिल्या आहेत. …
 डॉ. सुरेखा म. मुळे
वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती)