६९व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या मैदान सेवांचे उद्घाटन

nirkari

पुणे : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत निरंकारी मिशनचा वार्षिक संत समागम दिल्लीमध्ये १९ ते २१ नोव्हेंबर, २०१६ रोजी आयोजित करण्यात आला असून या संत समागमाच्या पूर्वतयारीसाठी मैदान सेवांचे विधिवत उद्घाटन मिशनच्या वर्तमान सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यांनी जमिनीवर फावडे मारुन केले. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातुन समागमाच्या सेवेमध्ये भाग घेण्यासाठी निरंकारी सेवादलाचे सदस्य व अन्य भक्तगण तुकड्या-तुकड्यांनी दिल्ली येथे जाण्यास सुरवात झाली आहे. उल्लेखनीय आहे की, यावर्षीचा संत समागम बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समर्पित असून समागमाचा मुख्य विषय “मानवीयता – एक समर्पित प्रवास” असा ठेवण्यात आला आहे.

जवळ जवळ ४०० एकर परिसरात पसरलेल्या समागम स्थळावर सत्संगाचा भव्य मंडप उभारण्याबरोबरच लक्षावधी भाविक-भक्तगणांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी निरंकारी सेवादलाचे सदस्य व अन्य भाविक भक्तगण रात्रंदिवस सेवा करतील. समागम स्थळावर पाणी, वीज, सिव्हरेज यांसारख्या सुविधांचा व्यापक प्रबंध केला जाणार असून सर्वांसाठी लंगर (महाप्रसाद), कॅन्टीन व डिस्पेन्सरी इत्यादी सुविधाही या मैदानांवर उपलब्ध राहतील.

उद्घाटन प्रसंगी सेवादल सदस्य आणि भाविक भक्तगणांना संबोधित करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या की, मागील कित्येक वर्षांपासून बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी समागमाची जी सुंदर रुपरेषा तयार केली आहे त्यानुसार आपण कार्य केले तर येणारा समागमदेखिल सुंदरप्रकारे साजरा होई.

सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले की, ज्याप्रमाणे बाबाजी सांगत असत की, कोणतीही सेवा लहान वा मोठी नसते. आपण निष्काम भावाने सेवा केली पाहिजे. अहंकार किंवा “मी”पणा बाजूला ठेवून आपण जी सेवा मिळेल ती करत जावे. बाबाजींनी स्वत: सेवादलाचा गणवेष परिधान करुन कित्येक वर्षे सेवा केली होती याचेही याप्रसंगी माताजींनी स्मरण करुन दिले.

सद्गुरु माताजींनी सांगितले की, भाविक भक्तगण आतापासून आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा आराम यांची चिंता न करता समागमाच्या प्रारंभिक तयारीच्या सेवांमध्ये भाग घेत आहेत. समागमाची सुंदर तयारी करावी असे त्यांनी सर्वांना आवाहन केले, ज्यायोगे येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोई-सुविधा उपलब्ध होऊ शकतील. प्रत्येक बालक, तरुण व वयस्कर भाविक भक्तगणाला समागम सेवेसाठी उत्तम आरोग्य आणि सुखमय जीवन प्राप्त व्हावे, असा आशीर्वाद सद्गुरु माताजींनी याप्रसंगी प्रदान केला.

तत्पूर्वी सेवादलाचे मेंबर इंचार्ज तसेच समागमाचे संयोजक व्ही. डी. नागपाल यांनी सद्गुरु माताजींकडे सर्व सेवादार समर्पण, निष्काम भाव आणि भक्तीभावनेने मैदान सेवा करु शकावेत यासाठी आशीर्वादांची कामना केली. समागम स्थळावर सद्गुरु माताजींचे आगमन होताच मंडळाच्या केंद्रीय योजना व सल्लागार बोर्डाचे अध्यक्ष गोविंदसिंहजी आणि मंडळाचे प्रधान जे. आर. डी. ’सत्यार्थी’ यांनी पुष्पगुच्छ देऊन सद्गुरु माताींचे स्वागत केलेञ सेवादलाचे मुख्य संचालक जे. एस. खुराना तसेच लेआऊट इंचार्ज मंगत राय यांनी सद्गुरु माताजींना उद्घाटनप्रसंगी सहकार्य केले.