शिक्षणात सर्जनशीलतेचा समावेश असावा : डॉ. विजय भटकर

jivraj

‘संवाद… सर्जनशील मनांशी’ विज्ञान-तंत्रज्ञान विशेषांकाचे प्रकाशन

पुणे : ”आपली भारतीय शिक्षणपद्धती परीक्षाभिमुख आणि घोकमपट्टी स्वरूपाची आहे. मुलांच्या मनात, डोक्यात अनेक हटके कल्पना असतात. मात्र, त्यांना योग्य तसा वाव मिळत नाही. नवनिर्मितीतून प्रगतीच्या दिशेने जायचे असेल, तर शिक्षणात सर्जनशीलतेचा समावेश असावा. त्यामध्ये आपण काय योगदान देऊ शकतो, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा,” असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले.

उचित माध्यम प्रकाशित ‘संवाद… सर्जनशील मनांशी’ या विज्ञान-तंत्रज्ञान विशेष अंकाचे प्रकाशन विद्यार्थी सहायक समितीच्या आपटे वसतिगृहात डॉ. भटकर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी सहायक समितीचे कार्यकारी विश्वस्त प्रभाकर पाटील, ‘संवाद… सर्जनशील मनांशी’च्या संपादिका रेश्मा जीवराज चोले, कार्यकारी संपादक जीवराज चोले आदी उपस्थित होते.

डॉ. विजय भाटकर म्हणाले, ”शिक्षण नाविन्यपूर्ण असावे. त्याला संशोधनाची जोड हवी. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून संशोधन अधिक प्रगल्भ केले, तर विज्ञानाचे अविष्कार आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याला ज्या भाषेत ज्ञान ग्रहण करणे अधिक सोयीचे आहे, त्या भाषेत ज्ञान घेतल्यास नवीन मूळ संकल्पना समजू शकतील. विज्ञान-तंत्रज्ञानाचा बाऊ न करता ते समजून घेऊन आपण त्यात नवे बदल काय घडवू शकतो, यावर विचार केला पाहिजे. नाविन्यपूर्ण संशोधनामुळे समाजातील प्रश्न सोडविण्यास मदत होउ शकेल. दैनंदिन जीवनातील विज्ञान अनुभवले पाहिजे.”

प्रभाकर पाटील म्हणाले, ”विज्ञानाचा आपल्या रोजच्या जगण्याशी अत्यंत निकटचा संबंध आहे. शालेय वयातच विज्ञान व तंत्रज्ञानाची आवड निर्माण झाली, तर सर्जनशीलतेला अधिक वाव मिळेल. केवळ पाठांतर न करता प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षण पद्धती विकसित केली, तर तंत्रज्ञानाचे अनेक अविष्कार आपल्याला अनुभवता येतील.”

विज्ञान-तंत्रज्ञाला वाहिलेला हा अंक असून, त्यातून विज्ञानाची विविध अंगे उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. मराठीतून विज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा हा प्रयत्न असल्याचे कार्यकारी संपादक जीवराज चोले यांनी प्रास्ताविकात सांगितले. सूत्रसंचालन जीवराज चोले यांनी केले. रेश्मा जीवराज चोले यांनी आभार मानले.