दोन लाखांवर वीजग्राहकांकडून ७० कोटींच्या थकबाकीचा भरणा

electricity3

पुणे : वीजदेयकांच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे परिमंडलातील ग्रामीण भागातील २ लाख ३३ हजार वीजग्राहकांनी ७० कोटी रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.

दरम्यान, वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकीदार वीजग्राहकांनी जवळच्या वीजजोडणीतून किंवा वीजचोरीतून वीज वापरल्यास भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी खंडित असलेल्या वीजजोडण्यांचीही तपासणी करण्यात येत आहे.

महावितरणकडून पुणे परिमंडलातील पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांत देयकांच्या वाढत्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याच्या नियमित मोहिमेला या महिन्यात आणखी वेग देण्यात आला आहे. पुणे परिमंडलात सप्टेंबर अखेरला ६ लाख १९ हजार वीजग्राहकांकडे १९० कोटी ७९ लाख रुपयांची थकबाकी होती. त्यानुसार थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई सुरु करण्यात आल्यानंतर २ लाख ३३ हजार वीजग्राहकांनी चालू देयकांसह ७६ कोटी ८३ लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. यात या ग्राहकांनी ७० कोटी रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. तसेच ३ कोटी ३१ लाख रुपयांच्या थकबाकीमुळे २२३० वीजग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे.

वीजग्राहकांनी ऐन दिवाळीमध्ये संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व महावितरणला नाईलाजास्तव कटू कारवाई करण्यास भाग पाडू नये. चालू व थकीत देयकांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्गांसह www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.