तरूणांबद्दल सरकार उदासीन का ? : डॉ. श्रीपाल सबनीस

unnamed (1)

‘अक्षरदान- स्पर्धा परीक्षा’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

पुणे : स्पर्धा परीक्षा हा सध्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत विषय आहे. पण स्पर्धा आहे तेवढ्या नोकऱ्या आहेत का? दहा लाख विद्यार्थी परिक्षेला बसतात, तीनशे पास होतात. तीन-तीन वर्षे जागा, जाहिराती निघत नाहीत. सरकारची तिजोरी खाली पडली का? की, सरकारच्या मेंदूला लकवा आला? तरुणांच्या बाबतीत सरकार कोमामध्ये का जातं? याचा रेषो काढणार आहेत का? असे प्रश्न डॉ. श्रीपाल सबनीस यांनी उपस्थित केले.

अक्षरदान स्पर्धा परीक्षा दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन जोहारकार सुशिल धसकटे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. सबनीस बोलत होते. साहित्य संमेलनाचे संयोजक सचिन इटकर, पीआयएसीचे संचालक पांडुरंग कोटुळे, साहित्यिक सचिन परब, महेश थोरवे, अक्षरदानचे संपादक मोतीराम पौळ यांची यावेळी उपस्थिती होती.

सबनीस पुढे म्हणाले, स्पर्धा परीक्षा एवढाच या अंकाचा विषय नाही. तर या समाजाच्या गाथा आहेत. या केवळ संघर्षाच्या गाथा नाहीत. तर प्रत्येकाच्या आत्मकथा आहेत. त्या महाराष्ट्राच्या समाज, संस्कृती जीवनाच्या चरित्रगाथा आहेत. व्यक्तीची गाथा ही, समाजाची गाथा असते.

‘जगण्याचे पर्याय कमी उरलेत, तरुणाई जगण्याच्या पेचात अडकलेली आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात तरुणांना पेलण्याची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत नाही. त्यामुळे निराश न होता. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल न उचलता, नवे उद्योगधंदे आपण शोधले पाहिजे. असेही आवाहन त्यांनी तरुणांना केले. मृगजळाच्या पाठीमागे आपण किती धावणार आहोत. स्पर्धा परिक्षेचे वय वाढवा म्हणता, पण 5-5 वर्षे आई-वडिलांनी तुम्हाला पोसायचे कसे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सुशिल धसकटे म्हणाले, ‘पूर्वी स्पर्धा परीक्षेत विशिष्ट समाजातील आणि श्रीमंतांचे प्राबल्य होते. पण ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील अधिकाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याचे श्रेय यूपीएससी-एमपीएससीला जाते.’ सचिन इटकर म्हणाले, स्पर्धा परीक्षेत अपयशी झालेल्या तरुणांनी अनेक क्षेत्रात गरुडझेप घेतली आहे. अशा तरुणांच्या यशोगाथा समाजापुढे मांडणे गरजेचे आहे.’

या अंकात निला सत्यनारायण, संदीप पाटील, शिवदीप लांडे, डॉ. प्रवीण मुंढे, सचिन इटकर यांनी त्यांचा प्रवास मंडला आहे. तरस्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या अठरा तरुण अधिकाऱ्यांच्या यशोगाथा या अंकात आहेत. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मोतीराम पौळ यांनी केले, तर सूत्रसंचालन संदीप बर्वे, तर आभार सचिन पवार यांनी मानले.