स्वरमयी ‘दिवाळी पहाट’ने भक्तीरसाची अनुभूती

divali pahat

पुणे : सूर निरागस हो… माझे माहेर पंढरी… तूज मागतो मी आता… आली माझ्या घरी ही दिवाळी… दिगंबरा दिगंबरा… चिंब पावसानं… या आणि अशा भक्ती-भावगीतांनी रविवारची पहाट स्वरमयी तेजाने उजळून निघाली. सोबतीला बहारदार हिंदी गीते आणि लावण्यांनी वातावरणात चैतन्यमय झाले.

निमित्त होते, लायन्स क्लब ऑफ इंटरनँशनल ३२३ डी २ यांच्यातर्फे आयोजित सूरपालवी प्रस्तुत शाहीर अण्णा भाऊ साठे रंगमंदिरात रंगलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे. पहाटेच्या रम्य वातावरणात दिव्यांच्या लखलखाटात गणेश वंदनाने दिवाळी पहाटची सुरुवात झाली.

लायन्स क्लब ऑफ इंटरनँशनलचे प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी, माजी आमदार उल्हासदादा पवार, माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई, जनसंपर्क अधिकारी शाम खंडेलवाल, लायन आनंद आंबेकर, शरद पवार, श्रीकांत तरडे आदी उपस्थित होते.

पल्लवी पत्की-ढोले, गौरव पवार, संदीप चाबूतस्वार (गायन) यांनी भक्ती-भावगीतांसह जुनी हिंदी, मराठी गाणी सादरीकरणातून करीत प्रेक्षकांना भक्तीरसाची अनुभूती दिली. पद्माकर गुजर (तबला), अंकुश भोर्डे (ढोलकी), संतोष खंडाळे (कीबोर्ड), हार्दिक रावल (गिटार) यांनी वाद्यांची उत्तम साथ दिली. संजय हिवराळे यांचे दिग्दर्शन आणि प्रा. महेश अचिंतलवार यांच्या ओघवत्या निवेदनाने कार्यक्रम बहरत गेला.

ऐसी लागी लगन, सत्यम् शिवम् सुंदरम्, मधुबन में राधिका नाचे, फूल तुम्हे भेजा है खत में, ये चाँद सा रोशन चेहरा, प्यार हुआ इकरार हुआ यांसारख्या बहारदार गीतांना श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली. आली ठुमकत नार लचकत, नेहमीच राया तुमची घाई या लावण्यांनी वन्समोअर आणि शिट्ट्यांचा पाऊस पडला. सुनो गौर से दुनियावलो या गीतातून जवानांना आणि देशवासीयांना अभिवादन करुन दिवाळी पहाट कार्यक्रमाची सांगता झाली.

आनंद आंबेकर, शरद पवार, श्रीकांत तरडे, आशा ओसवाल, सुनील पंडित, अशोक मिस्त्री, घनशाम खंडेलवाल यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.