सुबोध भावे आता लेखकाच्या भूमिकेत

subodh bhave

मराठी चित्रपट व नाट्य सृष्टीत आपल्या सकस अभिनय व दिग्दर्शनाने स्वतःचे आगळे स्थान निर्माण केलेला गुणी कलावंत सुबोध भावे लवकरच लेखन क्षेत्रात पदार्पण करत आहे.

त्याच्या ‘घेई छंद’ या पुस्तकाचे प्रकाशन . ९ नोव्हेंबर रोजी मुंबईत तर १२ नोव्हेंबर रोजी पुण्यात संपन्न होत आहे. पुण्यातील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारताना सुबोधने सांगितले की ‘कट्यार’ नाटकाच्या कविराजाच्या भूमिकेपासून, ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’ या आव्हानात्मक भूमिका आणि’ कट्यार’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाच शिवधनुष्य हा प्रवास त्याने ‘घेई छंद’ मध्ये शब्दांकित केला आहे. हा कालखंड महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात महत्वाचा ठरला असून त्याचे ‘ डोक्यूमेनटेन्शन’ होणे गरजेचे वाटल्यामुळे हे लेखन केल्याचे ही त्याने सांगितले. या प्रवासातील आव्हाने, अनुभव आणि आठवणीचा खजिनाच ‘ घेई छंद’ मध्ये खुला करण्यात आला आहे.

हे पुस्तक ‘रसिक साहित्य’ व ‘ ग्राफत ५’ यांनी संयुक्तरीत्या प्रकाशित केले असून या प्रसंगी माहिती देताना ‘रसिक साहित्य’ च्या योगेश नांदुरकर यांनी सांगितले कि, ४०० रुपये किंमत असलेल्या ‘घेई छंद’ ची प्रत १२ नोव्हेंबर पर्यंत रु. ३०० या खास प्रकाशनपूर्व किंमतीत आरक्षित करता येणार आहे. प्रकाशनपूर्व आरक्षण करणाऱ्या प्रत्येकाला ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’ आणि ‘कट्यार’ या चित्रपटांच्या डीव्हीडीज ही विनामूल्य दिल्या जाणार आहेत.

‘घेई छंद’ च्या प्रकाशनपूर्व आरक्षणाला प्रचंड प्रतिसाद लाभत असून सुबोधचे लेखनक्षेत्रातील पहिले पाउल त्याच्या कट्यार चित्रपटातील दिग्दर्शक म्हणून पदार्पणा इतकेच यशस्वी ठरेल असा विश्वास जाणकार रसिक व्यक्त करीत आहेत.