अद्भुतरम्य अनुभव देणारा ‘कौल′ १८ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात

kaul

जी. ए. कुलकर्णी, चि. त्र्यं. खानोलकर यांच्या साहित्यातून वाचकांनी अद्भुतरम्यता अनुभवली. तशीच अद्भुतरम्यता प्रेक्षकांना आता ‘कौल′ या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. बऱ्याच आंतरराष्ट्रीय महोत्सवांत गौरवलेला हा चित्रपट १८ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांत नवी चित्रभाषा येऊ लागली आहे. त्याला पुढे नेण्याचं काम ‘कौल′ हा चित्रपट करणार आहे. नव्या जाणिवेशी आणि नव्या चित्रभाषेशी नातं सांगणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडते. एका माणसाच्या हातून खून झाल्यानंतर त्याला येणारा अद्भुत अनुभव, घडणाऱ्या विचित्र घटना, त्याचा त्याच्या जगण्यावर होणारा परिणाम असं या चित्रपटाचं आशयसूत्र आहे.

युवा दिग्दर्शक अादिश केळुसकरनं या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. त्याच्या शॉर्टफिल्म्सनी त्याच्या स्वत:च्या चित्रभाषेविषयी उत्सुकता निर्माण केली आहे. आदिश मराठीतील महत्त्वाचे कवी महेश केळुसकर यांचा सुपुत्र आहे. त्यामुळे लेखनाचा संस्कार आणि चित्रभाषेची जाण यातून हा चित्रपट साकारला आहे. चिंटू सिंह आणि उमा महेश केळुसकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. रोहित कोकाटे, दीपक परब, मकरंद काजरेकर, सौदामिनी टिकले यांनी चित्रपटांतील भूमिका साकारल्या आहेत तर अमेय चव्हाण यांनी या सिनेमाचे छायांकन केले आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून ‘कौल’चं कौतुक झालं आहे. या चित्रपटाला २०१५च्या मामि चित्रपट महोत्सवांत यंग क्रिटिक्स अॅवॉर्ड, २०१६च्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत इंटरनॅशनल ज्युरींकडून विशेष पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे चित्रपटप्रेमींमध्ये कौल विषयी बरीच उत्सुकता आहे. अद्भुतरम्य अनुभव देणारा हा ‘कौल′ चुकवू नये असा अनुभव आहे.