उपेंद्र लिमये साकारतोय नकुशीमध्ये रणजित शिंदे

upendr limya

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता उपेंद्र लिमये साडेआठ वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. स्टार प्रवाहच्या अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या नकुशी… तरीही हवीहवीशी या मालिकेत तो रणजित शिंदे ही दमदार व्यक्तिरेखा साकारत आहे.

‘नकुशी… तरीही हवीहवीशी या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेचं कथानक आता महत्त्वाच्या वळणावर आलं आहे. मालिकेतील नायिकेला, नकुशीला आपल्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय हे माहीत नाही. त्यामुळे प्रेमात पडलेल्या नकुशीच्या आयुष्याचा प्रवास आता अधिक नाट्यमय वळणांचा होणार आहे.

गावाकडची नकुशी आता शहरात येणार आहे. अशातच रणजित शिंदे ही व्यक्तिरेखा मालिकेत एन्ट्री करणार आहे. रणजित शिंदे ही दमदार भूमिका साकारत आहे उपेंद्र लिमये. या रणजित शिंदेमुळे नकुशीचं आयुष्यच बदलून जाणार आहे. रणजित शिंदेमुळे नकुशीच्या आयुष्याचं काय होतं, हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

छोट्या पडद्यावरील पुनरागमनाविषयी उपेंद्र म्हणाले, आतापर्यंत मी नाटक, टीव्ही मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत काम केलं. मधली बरीच वर्षं मराठी आणि हिंदी चित्रपटांत बिझी होतो. मला नेहमी विचारलं जातं, की नाटक, टीव्ही आणि चित्रपट यांत तुझं आवडतं माध्यम कोणतं ? पण त्याचं एक असं नेमकं उत्तर नाही. ही तिन्ही माध्यमं वेगळी आहेत. तिन्ही माध्यमांच्या शक्यता, शक्तीस्थानं आणि मर्यादा वेगवेगळ्या आहेत. मला या तिन्ही माध्यमांत काम करायला आवडतं. चित्रपटांत बिझी असलो, तरी मला मालिका करायची होती. त्यासाठी चांगला विषय, चांगली व्यक्तिरेखा, चांगला सेटअप हवा होता. नकुशीच्या निमित्तानं ते सगळं जुळून आलं याचा मला आनंद आहे. टीव्ही मालिका हे खूप अर्थपूर्ण माध्यम आहे. त्याचा वापर कोण कसा करतो हे महत्त्वाचं आहे. आपल्याला जे म्हणायचं आहे, त्यातल्या बिटविन द लाईन इथं नेमकेपणानं दाखवल्या जाऊ शकतात. विषयाचं, व्यक्तिरेखांचं डिटेलिंग मालिकेत अधिक सविस्तर करणं शक्य होतं. नकुशी ही मालिका खरंच खूप वेगळी आहे. सामाजिक-सांस्कृतिकदृष्ट्या हा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे या मालिकेच्या निमित्तानं मी पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय याचा मला खास आनंद आहे.

रणजित शिंदे ही दमदार व्यक्तिरेखा आहे. या भूमिकेला खूप पदर आहेत
चिंचाळकर या मालिकेचा बारकाईनं विचार करतोय. त्यामुळे प्रत्येक व्यक्तिरेखा खूप इंटरेस्टिंग होतेय. रणजित शिंदेही तसाच इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामुळे नकुशीच्या आयुष्याचा प्रवास कसा होतो ते प्रत्यक्ष मालिकेतच पहावं लागेल, असं उपेंद्र यांनी भूमिकेविषयी सांगितलं.

उपेंद्र लिमयेसारखा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता मालिकेत महत्त्वाची भूमिका करत असल्यानं नकुशीची साकारणारी प्रसिद्धी आयलवार खुश आहे. आतापर्यंत नकुशीचा प्रवास हा खूप छान पद्धतीनं साकारला गेला. छोट्या नकुशीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. तसंच प्रेम ते मोठ्या नकुशीवरही, म्हणजे माझ्यावरही करतायत. प्रेमात पडलेल्या नकुशीच्या आयुष्याचा नवा प्रवास आता सुरू होणार आहे. आता उपेंद्र सरांची मालिकेत एन्ट्री होतेय. त्यांच्यासारखा सीनियर कलाकार मालिकेत येणार असल्याचा खूप आनंद आहे. त्यांच्याबरोबर काम करायला मिळावं असं वाटत होतं. ती संधी नकुशीमुळे मिळतेय. वैभव सरांमुळे माझ्यात आणि उपेंद्र सरांमध्ये छान केमिस्ट्री झाली आहे. उपेंद्र सरांमुळे मला वेगळीच एनर्जी मिळते. त्यांच्याकडून अभिनयातले बारकावे शिकता येत आहेत. एकच सीन वेगवेगळ्या प्रकारे कसा केला जाऊ शकतो, त्याच्या शक्यतांचा विचार करायला मिळतो. अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे. उपेंद्र सरांसह काम करण्याचा अनुभव मला समृद्ध करणारा आहे, असा अनुभव तिनं सांगितला.