मुलभूल प्रश्नांवर सरकार असंवेदनशील- भाई वैद्य

DSC_0357

गुडविल इंडिया उपक्रमाला ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड’चे प्रमाणपत्र प्रदान

एका आठवड्यात जमवले 2,93,623 जुने कपडे

 

पुणे, प्रतिनिधी.

            गाई मारल्या म्हणून गुजरातमध्ये दलितांना मारहाण केली. पण तेव्हा पंतप्रधान गप्प बसले. महिन्यानंतरही मारहाण करणाऱ्यांवर करवाई न करता, माझ्यावर गोळ्या घाला पण दलितांवर हल्ले करू नका, असं पंतप्रधान म्हणतात. हे बेगडी दलित प्रेम दाखवणे योग्य नाही. मुलभुत प्रश्न आणि जनतेप्रती सरकार संवेदनशील नाही. अशा शब्दांत ज्येष्ट समाजवादी नेते भाई वैद्य यांनी मोदी सरकारवर टीका केली.

गुडविल इंडिया उपक्रमाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र भाई वैद्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ, आरोग्य सेनेचे डॉ. अभिजीत वैद्य, उद्योजक रोहिदास मोरे, गुड विल इंडिया उपक्रमाचे संस्थापक-अध्यक्ष कालिदास मोरे, उत्तमनगरचे उपसरपंच सुभाष नानेकर, परिवर्तन संस्थेचे अशोक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

भाई वैद्य म्हणाले, “देशात गरिबी वाढली. महागाईने कळस गाठलाय. इतके दिवस ते म्हणायचे, अच्छे दिन आएंगे. आता म्हणायला सुरुवात केलीय की, अच्छे दिन आ गए, पण तुम्हाला ते दिसत नाहीत. तुम्ही त्या नजरेने बघत नाहीत. पण अच्छे दिन फक्त आमदार-खासदार आणि सातवा वेतन आयोग लागु झालेल्या कर्मचाऱ्यांचे आलेत. सामान्य जनतेसाठी नाही.”

“देशात सध्या शिक्षण, आरोग्य, अन्नधान्य महाग झाले आहे. महागाई 6% पेक्षा वर गेली. सरकारने महागाई कमी करायला पाहिजे. पण प्रत्येक सरकारच्या काळात महागाई वाढतच जाते, त्यामुळे गरीब समाजातील मुलांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते. तर दुसरीकडे इंग्रजी शाळांना मान्यता द्यायची, पण मराठी शाळांना मात्र नाही. ही बाब चिंताजनक आहे.” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

भाई पुढे म्हणाले, देशातील अनेक प्रश्नांवर सामाजिक संस्थांनी गुडविल इंडिया उपक्रमासारखे काम केले पाहिजे आणि समाजाने चांगल्या गोष्टी सहज स्विकारल्या पाहिजेत. तसेच राळेगण सिध्दी, हिवरे बाजार, गुडविल इंडियाचे अनुकरण झाले पाहिजे. सेवेचे मार्ग उपलब्ध होण्याचा हा एक मार्ग आहे. याची साखळी सुरु झाली तरच सामाजिक कार्याची व्यापक चळवळ उभी राहील.”

अशोक मोहोळ म्हणाले, “गरीबांना चांगले अन्न, वस्त्र देण्याचे काम करणारे फार कमी लोक आहेत. कालिदास मोरे यांच्या वस्त्रदान करण्याच्या उपक्रमाची जागतिक पातळीवर गिनीज बूकमध्ये नोंद झाली. परमेश्वराला दोन हात जोडून नमस्कार करण्यापेक्षा, एका हाताने गरिबांना मदत करणे कधीही श्रेष्ठ. हीच खरी ईश्वरभक्ती असून हे काम गुडविल इंडिया करित आहे.”

अभिजीत वैद्य म्हणाले, “देशातील जनतेचे लक्ष राम मंदिर, बाबरी मस्जिद, गाय अशा आफुच्या गोळ्यांवर अडकवून ठेवले आहे. त्यामुळे आमचं लक्ष मुलभुत प्रश्नांवर कधी जात नाही, हे दुर्दैव आहे.”

कालिदास मोरे म्हणाले, 1 लाख 54 हजार कपडे जमा करण्याचा जागतिक रेकॉर्ड होता. आम्ही 3 लाख जुने कपडे जमा करण्याचे ठरविले. गुडविल इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून एका आठवड्यात 2 लाख 93 हजार 623 कपडे जमा केले. त्यावर प्रक्रिया करून गरीब आणि गरजूंना वाटप करत आहोत. तसेच 30 रुपयांमध्ये सुरु केलेल्या जेवणाची थाळी या उपक्रमातून महिलांनाही रोजगार मिळाला.” गुडविल इंडिया उपक्रमाच्या चौथा वर्धापन दिनानिमित्य गरजूंना 30 रुपयांमध्ये गुडविल थाळी या उपक्रमाचे उद्घाटनही यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन धायरे यांनी तर आभार अतिश मोरे यांनी मानले.