achin kundalkar

पुणे : भाषा हा लोक आणि संस्कृती यांना जोडणारा पूल असतो आणि ज्याला अधिकाधिक भाषा अवगत असतील त्याची सांस्कृतिक श्रीमंती मोठी असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट दिगदर्शक सचिन कुंडलकर यांनी शनिवारी केले. “आपल्या स्वतः च्या भाषेच्या अभिमानाबरोबरच इतर भाषांबद्दलचे प्रेम आणि उत्सुकता महत्त्वाची असते आणि नवनवीन भाषा आत्मसात करण्यातून नवनवीन संस्कृतींची ओळख होऊन माणूस समजण्यास मदत होते, असे श्री कुंडलकर म्हणाले. असोसिएशन ऑफ लँगवेज प्रोफेशनल्स या भाषाप्रेमींच्या संघटनेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कुंडलकर बोलत होते. भाषा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा स्वाती राजे कार्यक्रमाला विशेष सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या. असोसिएशन च्या संस्थापिका ललिता मराठे आणि केतकी नवाथे व्यासपीठावर उपस्थित होत्या.

“माणूस एक असतो; त्याला एक शरीर, एक मन असते. परंतु नवी भाषा शिकताना याच माणसातून आणखी एक माणूस तयार होत असतो,” असे नमूद करून कुंडलकर म्हणाले की अनेक भाषांचे प्रभुत्व ही कुठल्याही ऐहिक श्रीमंती पेक्षा मोठी श्रीमंती आहे. प्रत्येकाने दरवर्षी एका नवीन भाषेचा परिचय करून घ्यावा असे ते म्हणाले. भाषा ही एक वेगवान आणि सतत विस्तारणारी आणि बदलणारी संकल्पना असते आणि या वेगाचा, बदलाचा माग आपण सतत ठेवला पाहिजे, असे कुंडलकर म्हणाले.

भाषेच्या ज्ञानाचे संवर्धन करणे आणि सतत त्याच्या क्षमतेची खोली वाढवणे हे समाजाच्या सांस्कृतिक स्वास्थ्याचा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे, असे राजे यांनी सांगितले. भारतीय समाजाच्या बहुभाषिकत्वातून इथल्या लोकांना विविध भाषांची जाण आपसूकच असते मात्र ही जण अधिकाधिक समृद्ध करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. भाषा आणि अर्थार्जन यांचा व्यावहारिक संबंध जोडणे ही भाषेच्या संवर्धनात मोठी मदत ठरू शकेल, असे राजे म्हणाल्या.

ललिता मराठे यांनी संस्थेच्या उद्दिष्टांचा परिचय करून दिला. विविध भाषांचे कौशल्य असलेल्या आणि व्यावसायिक पातळीवर काम करू इच्छिणा-या व्यक्तींची सतत विचारणा होत असते, मात्र अशा व्यक्तींची माहिती एकत्रपणे मिळू शकत नाही. भाषिक कौशल्य असलेल्या व्यक्तीना एका व्यासपीठावर आणण्याचे काम असोसिएशन करील , असे मराठे म्हणाल्या.

भाषाप्रेमींसाठी कार्यशाळा , व्याख्याने , मेळावे , लेखनस्पर्धा , परिसंवाद असे विविध उपक्रम संघटनेतर्फे आयोजित होतील असे नवाथे म्हणाल्या. खास विद्यार्थ्यासाठी “क्लासरूम टु करिअर ” हा भाषा क्षेत्रात करिअर करण्यासंबंधी चा उपक्रम आयोजित केला जाईल असे त्या म्हणाल्या.

अर्चना गोगटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आभार मानले.

लेखक, भाषान्तरकार, संपादक, दुभाषे, शिक्षक, सब टायटल्स तज्ज्ञ अशा विविध व्यावसायिकांना संघटनेचे सदस्य होता येईल . यासाठी www.languageprofessionals.in या इंटरनेट साईट वर नोंदणी करता येईल.