मधुमेह जनजागृतीसाठी अनोख्या उपक्रमाला सुरूवात

daiybitis

डायबेटीस केअर अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशन तर्फे मधुमेह जनजागृतीसाठी अनोख्या उपक्रमाला सुरूवात

पुणे : डायबेटीस केअर अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशन (डीसीआरएफ),लायन्स क्लब्स इंटरनॅशनल तर्फे व जीतो आणि रूबी हॉल क्लिनिकच्या सहकार्याने मधुमेह जागरूकता सप्ताहाला आज सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटस् (एसजीआय) बावधन कॅम्पस येथे मानवी साखळीद्वारे मधुमेह जनजागृती करण्यात आली.या रॅलीमध्ये सुर्यदत्ता नॅशनल स्कुलचे विद्यार्थी,सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटसचे विद्यार्थी आणि त्यांचे सर्व शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी मोफत डायबेटिस निदान कॅम्पचे देखील आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाला सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटस् (एसजीआय) बावधन व किरण दगडे पाटील यांनी सहकार्य केले.

या उपक्रमाला आमदार मेधा कुलकर्णी,डायबेटीस केअर अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशन (डीसीआरएफ) चे अध्यक्ष मधुमेह तज्ञ डॉ.अभय मुथा, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटस (एसजीआय)चे संचालक डॉ.संजय चोरडिया,सचिव सुषमा चोरडिया,अ‍ॅब्स फिटनेस अ‍ॅन्ड वेलनेस क्लबचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू साबळे,भाजपच्या प्रवक्त्या श्‍वेता शालिनी,व्यावसायिक अंकुश तिवारी,भाजपचे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते किरण दगडे पाटील,नीलकंठ बजाज,लायन्स् क्लबचे प्रांतपाल चंद्रहास शेट्टी,डिस्ट्रिक्ट पीआरओ श्याम खंडेलवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ.अभय मुथा यांनी मधुमेहाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि, सध्या 18 कोटी मधुमेही रुग्ण जगामध्ये आहेत आणि त्यापैकी 6 ते 7 कोटी भारतात आहेत. हि संख्या लक्षात घेता यावर तातडीने काही पाऊले उचलली नाहीत तर 2020 पर्यंत भारत हा जागतिक मधुमेहाची राजधानी बनेल, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली असल्याचे त्यांनी सांगितले.2020 मध्ये जगात एकूण 30 कोटीच्या वर मधुमेही असतील आणि त्यातील 10 कोटीच्यावर एकट्या भारतात असतील तर अशावेळेस फार गंभीर परिस्थिती निर्माण होईल असे मुथा यांनी सांगितले.

जंक फूड, फास्ट फूड यांचे सातत्याने सेवन करणे, तसेच कॉम्पुटर किंवा स्मार्ट फोनचा अतिरिक्त वापर, व्यायामाचा अभाव, सकस आहाराचा अभाव, व्यस्त जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी, घरगुती व कामाच्या ठिकाणचे ताण-तणाव यामुळे मधुमेहाची शक्यता वाढते. मधुमेहावर प्रतिबंध घालण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, ताणतणाव कमी होण्यासाठी ध्यानधारणा, योगासने करण्याचा सल्ला यावेळी मुथा यांनी दिला.

अभिमन्यू साबळे यांनी यावेळी व्यायामाचे महत्व पटवून देताना सांगितले कि, नियमित व्यायामामुळे मानसिक ताण कमी होतो. आपली शारीरिक व मानसिक शक्ती चांगली राहते.वैयक्तिकरित्या पालकांनी आपल्या मुलांच्या शारिरीक स्वास्थाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. तसेच, आपल्या मुलांना शारीरिक स्वास्थासंबंधी दररोज आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे. प्रत्येकाची शारिरीक क्षमता ही वेगळी असते आणि त्यानुसार आपली शारीरिक क्षमता, गरजा लक्षात घेऊन त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीर स्वास्थपूर्ण ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.