अपोलो हॉस्पिटलचे नवी मुंबईत उद्घाटन

apolo

​​पुणे : अत्यंत कलात्मक पद्धतीने बांधण्यात आलेल्या, जागतिक दर्जाची आरोग्यसेवा पुरवणाऱ्या अपोलो हॉस्पिटलच्या नवी मुंबईतील शाखेचा उद्घाटन सोहळा अधिकृतरित्या महाराष्ट्र व तामिळनाडू राज्याचे राज्यपाल सी.एच. विद्यासागर राव यांच्या हस्ते नुकताच पार पडला. या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबविकास मंत्री डॉ. दीपक सावंत हे देखील यावेळी हजर होते.

नवी मुंबईत जागतिक दर्जाच्या रुग्णालयांची मांदियाळी असली तरी नव्याने सुरू झालेले अपोलो रुग्णालय हे या मांदियाळीतील 66 वे रुग्णालय आहे. महाराष्ट्र व तामिळनाडू राज्याचे राज्यपाल सी.एच. विद्यासागर राव यांनी उद्घाटनसोहळ्यादरम्यान केलेल्या भाषणात सांगितले की, ´जागतिक दर्जाची आरोग्यसेवा बहाल करणारे तसेच, वैद्यकीय व तंज्ञत्रानाच्या बाबतीत कुणी हात धरू शकणार नाही अशा पात्रतेचे अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईत सुरू होत आहे व त्याचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळत आहे, याबद्दल मला आनंद होत आहे. महाराष्ट्रातील लोकांच्या सेवेसाठी हे रुग्णालय सुयोग्य आहे. भारतीय आरोग्यसेवेमध्ये मोलाची भर घातल्याबद्दल अपोलो हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. प्रथाप सी. रेड्डी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.´

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आपले मत मांडले. ते म्हणाले, ´अपोलो हॉस्पिटल हे नवी मुंबई भागातील सर्वांत अद्ययावत हॉस्पिटल असून येथील लोकांच्या आरोग्यविषयक गरजा या हॉस्पिटलच्या माध्यमातून उत्तम प्रकारे पूर्ण होऊ शकतील. या भागात अपोलोसारखे खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाची सेवा देणारे हॉस्पिटल सुरू केल्याबद्दल मी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. प्रथाप सी. रेड्डी यांचे अभिनंदन करतो. महाराष्ट्रातील लोकांना या जागतिक दर्जाच्या सेवेचा फायदा होणार आहे. तसेच, देशभरातील तसेच, जगभरातील लोकांना उपचारांसाठी नवी मुंबईत येण्याची प्रेरणा या हॉस्पिटलमधून मिळणार आहे.´

या सोहळ्यादरम्यान अपोलो हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. प्रथाप सी. रेड्डी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ´प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या टप्प्यात जागतिक दर्जाची आरोग्यसेवा आणून ठेवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. 1983 मध्ये आमच्या हॉस्पिटलची स्थापना झाल्यापासून जगभरातील जवळजवळ 121 देशांतील 5 कोटी लोकांचा विश्वास संपादन करण्यात आम्हाला यश आले आहे. भारतातील तसेच, स्वस्त दरात उच्च दर्जाची आरोग्यसेवा मिळवण्याच्या हेतूने भारतात आलेल्या आंतरराष्ट्रीय रुग्णांना सुयोग्य व जागतिक दर्जाची सेवा पुरवण्याचे काम नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल करणार आहे. तीन दशकांहून अधिक काळ वैद्यकीय दृष्टीकोनातून सर्वोत्कृष्ट ठरलेले अपोलो हॉस्पिटल आरोग्यसेवा पुरवण्यात व रुग्णांचा विश्वास संपादन करण्यात महाराष्ट्रातील आरोग्यसेवेत एक नवा पायंडा पाडणार आहे.´

नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयाचे सीईओ डॉ. नरेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले, ´नवी मुंबई आणि आजुबाजूचा परिसर अत्यंत झपाट्याने वाढत चालला असला, तरीही इथल्या सर्वसामान्य माणसाला चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवेसाठी खूप प्रवास करून जावे लागते. परंतु, आता जागतिक दर्जाची आरोग्यसेवा अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून नवी मुंबईत उपलब्ध होत असल्याने ती सर्वांसाठी सोयीची ठरणार आहे. अधिक महत्वाचे म्हणजे, मुंबई-पुणे दृतगती महामार्गाला लागूनच हे रुग्णालय असल्याने गर्दीच्या वेळेतही रुग्णांना येथे पोहोचणे फार कष्टाचे होणार नाही. या रुग्णालयात 17 बेड्सचा आपत्कालीन सेवा विभाग, 120 बेड्सचा अतिदक्षता विभाग तर 24 तास 7 दिवस चालू असणारे आपत्कालीन सेवा केंद्र आहे.´

नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात अत्याधुनिक पद्धतीच्या निदान व उपचारसेवा उपलब्द हेत. यात भारतातील सर्वांत आधुनिक कॅथ लॅब, डिजिटल मॅमोग्राम, एक्स-रे, स्टिरिओटॅक्टिक बायोप्सी, 3 टेस्ला एमआरआय आदी सेवांचा समावेश आहे. ह्रदयरोग, अस्थिरोग व जॉईण्ट रिप्लेसमेंट, 24 तास सुरू असणारे आपत्कालिन सेवा केंद्र, जनरल मेडिसीन, लॅपरोस्कोपिक व जनरल शल्यचिकित्सा, बॅरियाटिक व वेट लॉस शल्यक्रिया, नेफ्रॉलॉजी व डायलेसिस केंद्र, युरोलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जरी, प्युल्मोनोलॉजी, गॅस्ट्रोएण्टरॉलॉजी, भूलशास्त्र, नाक-कान-घसा, स्त्रीरोग, बालरोग, रेडिओलॉजी, पॅथोलॉजी, ऑर्गन ट्रान्स्प्लाण्ट, मेडिकल ऑन्कोलॉजी, सर्जिकल ऑन्कोलॉजी आदी सेवा या रुग्णालयात उपलब्ध आहेत. यु.के., अमेरिका व भारतातील सर्वोच्च दर्जाच्या वैद्यकीय शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतलेले अनुभवी व कुशाग्र डॉक्टर्स नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयाच्या सर्व विभागांमध्ये कार्यरत आहेत. 24 तास रुग्णांना उच्च दर्जाची सेवा पुरवण्यासाठी परिचारिका विभाग तसेच, इतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

7 लाख चौरस फूटांच्या जागेवर वसलेले नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात 50 हून अधिक आरोग्यसेवा जागतिक दर्जा गाठून पुरवल्या जातात. 500 बेड्सचे हे रुग्णालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे युक्त असून इथे 14 शल्यक्रिया कक्ष, 3 कॅथ लॅब, 69 कन्सल्टेशन विभाग, सुपीरिअर 5 – बेड स्टॅण्डर्ड विभाग आहेत. येथील रुग्णांसाठीच्या स्वतंत्र खोल्याही अत्यंत आलीशान व सुटसुटीत असून 4500 चौरस फूट इतके पसरलेले अध्यक्षीय कक्ष आहेत.