माणूस होण्यासाठी ज्ञानाबरोबरच शहाणपण गरजेचे : अ‍ॅड. भास्करराव आव्हाड

bhaskar ahavad

रतनलाल सोनग्रा याना ‘प्रबुद्ध साहित्यिक पुरस्कार’ प्रदान

पुणे : “माणूस होण्यासाठी केवळ ज्ञान असून चालत नाही. त्याला शहाणपणाची जोड असावी लागते. शहाणपण हे उपजत येते किंवा अनुभवातून येते, तर चारित्र्य घडविले जाते. चारित्र्य घडविण्याचे काम शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्याला ज्ञान देण्यासह त्याचे चारित्र्य घडविण्यावर भर द्यायला हवा,” असे प्रतिपादन ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांनी केले.

प्रसिद्ध साहित्यिक बाबा भारती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एस. एम. जोशी सभागृहात आयोजित केलेल्या तिसर्‍या विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा यांना ऍड. आव्हाड यांच्या हस्ते ‘बाबा भारती प्रबुद्ध साहित्यिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, संमेलनाध्यक्ष आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ, पुणेचे सचिव डॉ. विकास आबनावे, स्वागताध्यक्ष आणि राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, माजी संमेलनाध्यक्ष शंकर आथरे, निमंत्रक महेंद्र भारती, प्रा. विद्या चौकसे आदी उपस्थित होते.

अ‍ॅड. भास्करराव आव्हाड म्हणाले, “शिक्षक आणि धर्मउपदेशक यामध्ये मोठा फरक आहे. शिक्षक घडविण्याचे, तर उपदेशक एका चौकटीत बसविण्याचे काम करतो. त्यामुळे शिक्षकाची भूमिका महत्वाची असते. सद्यस्थितीत गुणी लोक राजकारणापासून दूर असल्याने अवगुणी लोक सत्तेवर येतात. हे बदलायचे असेल, तर विवेकी लोकांनी मतदानाचा अधिक बजावला पाहिजे. मोल आणि मूल्य यातील फरक ओळखणेही गरजेचे आहे.”

उल्हास पवार म्हणाले, “भारतीय अध्यात्मिक संस्कृतीत सहिष्णुता, समता आणि उदारमतवादी विचार दिला आहे. परंतु, आज जातीधर्माच्या नावावर होणारी वाटणी दुर्दैवी आहे. संतानाही यामध्ये विभागले जात आहे. चांगले कार्य करणाऱ्याचे कर्तृत्त्व नाही, तर जात पाहिली जाते, हे बघून दुःख होते. जगातल्या भाषा आत्मसात करण्यासह आपल्या भाषांचे संवर्धन करणेही गरजेचे आहे.”

पुरस्काराला उत्तर देताना रतनलाल सोनग्रा म्हणाले, “प्रबुद्ध साहित्यासाठी हा पुरस्कार मिळाला, याचा आनंद आहे. आपले साहित्य अधिकाधिक लोकमंगलासाठी असावे, यासाठी माझा प्रयत्न राहिला आहे. साहित्यामध्ये विशाल दृष्टी असायला हवी. तसेच ती जगभर पोहचली, तर बंधुतेचा भाव रुजेल. देशामध्ये चांगला विवेक पेरण्याची जाबाबदारी साहित्यिक व शिक्षकांवर आहे.”

डॉ. विकास आबनावे म्हणाले, “विद्यार्थ्याच्या व शिक्षकांच्या सादरीकरणातून आम्ही ताटीचे अभंग अनुभवले आहेत. त्यांनी सादर केलेले साहित्य हे अत्यंत कसदार आणि दर्जेदार आहे. त्याचे संकलन पुस्तकरूपात करण्यात येणार असून, हा साहित्य ठेवा समाजापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत केला जाणार आहे.”

विद्या चौकसे यांनी सूत्रसंचालन केले. रेणुका स्वरूप शाळेच्या पुष्पलता लाड यांनी आभार मानले.