दुसऱ्या टी२० वर्ल्ड कप क्रिकेट फॉर द ब्लाईंड स्पर्धेच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

v

पुणे : दुसऱ्या टी२० वर्ल्ड कप क्रिकेट फॉर द ब्लाईंड स्पर्धेच्या तयारीने वेग पकडला असून या विश्वकरंडक स्पर्धेच्या सामन्यांचे वेळापत्रक माजी भारतीय क्रिकेटपटू व कर्णधार पद्मश्री दिलीप वेंगसरकर यांनी आज येथे जाहीर केले. येत्या जानेवारी-फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे यजमानपद ‘समर्थनाम ट्रस्ट फॉर द डिसेबल्ड’ची क्रिकेट शाखा असलेली ‘क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाईंड इन इंडिया’ (सीएबीआय) ही संघटना भूषवत आहे.

याप्रसंगी आपला दृष्टीकोन व्यक्त करताना दिलीप वेंगसरकर म्हणाले, की अंध क्रिकेटपटूंमधील चैतन्यामुळे मी भारावून गेलो आहे. हे खेळाडू समस्त जगासाठी प्रेरणा असून त्यांना खेळ व जीवनातील बुद्धिमत्ता, इच्छाशक्ती व आकांक्षा यांचे प्रदर्शन घडवण्यासाठी या स्पर्धेइतके उत्तम व्यासपीठ अन्य कोणतेही नाही. अंधांसाठी क्रिकेट खेळाचे वर्षानुवर्षे संवर्धन करण्यात ‘सीएबीआय’ संघटनेच्या अद्भुत प्रयत्नांबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अंधांसाठी क्रिकेट या मोहिमेला कायम पाठिंबा देण्याची प्रतिज्ञा मी करत आहे.

ते पुढे म्हणाले, की या स्पर्धेत उतरणाऱ्या भारतीय संघाकडे बुद्धिमत्ता असून विश्वकरंडक जिंकण्यासाठी खेळाडू करत असलेली तयारी महत्त्वाची ठरेल. स्पर्धेत सहभागी होणारा भारतीय संघ, तसेच इतर आंतरराष्ट्रीय संघांना मी शुभेच्छा देतो. लोकांनीही पुढे यावे व या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामने बघावेत, असे मी व्यक्तीशः आवाहन करतो.

वेंगसरकर या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने ‘सीएबीआय’चा उत्साह द्विगुणित झाला. भारतातील महान क्रिकेटपटूंपैकी असलेल्या दिलीप वेंगसरकर यांनी या उपक्रमाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद देताना ‘सीएबीआय’चे अध्यक्ष महंतेश जी. के. म्हणाले, की वेंगसरकर सरांनी ‘दुसऱ्या टी२० वर्ल्ड कप क्रिकेट फॉर ब्लाईंड’ स्पर्धेतील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केल्याने आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. व्यग्र नियोजनातून वेळात वेळ काढून ते या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी आभार मानतो. त्यांची उपस्थिती अंध क्रिकेटपटूंना प्रेरित करेल आणि आत्मविश्वास वाढवेल.

हे विश्वकरंडक सामने येत्या २८ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०१७ या काळात देशभरातील विविध शहरांत खेळले जातील. त्यातील अनेक सामने मुंबईतही होतील. स्पर्धेची तयारी ज्या पद्धतीने साकारत आहे, ते पाहता मी स्वतः उत्साहाने भारुन गेलो आहे आणि मला विश्वास आहे, की ‘समर्थनाम ट्रस्ट फॉर डिसेबल्ड’ व ‘क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाईंड इन इंडिया’ दृष्टीवंचितांसाठी राबवत असलेल्या जागतिक जागृती उपक्रमांतर्गत हे सामने कमालीचे यशस्वी ठरतील, असे श्री. महंतेश यांनी बोलून दाखवले.

स्पर्धेचे उद्घाटन नवी दिल्लीत होणार असून महासमारोपाचा कार्यक्रम बेंगळुरुमध्ये होईल. या विश्वकरंडक स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, नेपाळ, न्यूझिलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका व वेस्ट इंडिज या देशांचे संघ सहभागी होत आहेत. हे सामने भारतातील विविध शहरांत लीग-कम-नॉकआऊट पद्धतीने खेळवले जातील.

यंदाच्या या विश्वकरंडक स्पर्धेसाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून क्रिकेटपटू राहुल द्रवीड यांच्या नावाची घोषणा नुकतीच करण्यात आली. राहुलने यावेळी ‘सीएबीआय’च्या ‘सपोर्ट ब्लाईंड क्रिकेट बाय बाईंग ए क्रिकेट बॉल’ या मोहिमेचा शुभारंभही केला. अंधांसाठी क्रिकेट पुढाकाराला मदतीसाठी विद्यार्थी व सर्वसामान्य प्रेक्षक www.blindcricket.in या संकेतस्थळावरुन क्रिकेट बॉलची ऑनलाईन खरेदी करु शकतील.

श्री. महंतेश पुढे म्हणाले, की क्रिकेट खेळाला भारतात एखाद्या धर्माहूनही अधिक महत्त्व आहे आणि दृष्टीवंचितांमधील या खेळाच्या आकांक्षेला साह्य केल्याने त्यांच्यातील सुप्त खिलाडूवृत्ती अधिक प्रबळ होईल. या खेळात शिस्त, संघभावना, तंदुरुस्ती, व्यूहात्मक नियोजन व स्पर्धात्मकता असते आणि येथे असमर्थतेपेक्षा कौशल्यावर भर दिला जातो. ‘ब्लाईंड क्रिकेट’ उपक्रमामुळे दृष्टीवंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यास, तसेच रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होईल. ‘क्रिकेट फॉर द ब्लाईंड इन इंडिया’ला समाज, कंपन्या व सरकारकडून हा खेळ, पायाभूत सुविधा, सामन्यांचा खर्च व खेळाडूंचे मानधन आदी विकासकामांसाठी भरघोस पाठिंबा, निरंतर आर्थिक साह्य व प्रायोजकत्वाची गरज आहे.

या स्पर्धेचे यजमानत्व व आयोजन यासाठी सुमारे २४.५ कोटी रुपये खर्च येणार आहे. देशातील कंपन्या, सरकार व नागरिकांनी प्रायोजन आणि योगदानासाठी पुढे यावे. या देणगीला प्राप्तिकर कायद्याच्या ८०जी कलमांतर्गत सवलत आहे. याखेरीज या उपक्रमाची कॉपोर्रेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पुढाकारांतर्गत निम-क्रीडा (पॅरा-स्पोर्ट्स) श्रेणीतही नोंद झाली आहे.