मराठी साहित्याच्या अभिरुचीचा पोत नारायण सुर्वेंनी बदलला : डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

p1

पुणे, प्रतिनिधी:  मध्यमवर्गीय अभिरुचीला तडा देऊन वेगळं साहित्य सुर्वेंनी निर्माण केले. मराठी साहित्याच्या अभिरुचीचा पोत बदलण्याचे काम नारायण सुर्वेंनी केले. घामाचा आणि श्रमाचा वास त्यातून दरवळतो आहे. असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.      मसाप, आशय सांस्कृतिक आणि अक्षरधारा यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित ‘व्यक्तीवेध’ या कार्यक्रमात कविवर्य नारायण सुर्वे या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी,  आशयचे वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार व अक्षरधाराच्या  रसिक राठिवडेकर,  उपस्थित होते. यावेळी नारायण  सुर्वे यांची ‘डोंगरी शेत माझं गं’ ही कविता चंद्रकांत वानखेडे यांनी सादर केली. डॉ. कोत्तापल्ले यांच्या व्याख्यानानंतर नारायण गंगाधर सुर्वे यांचा जीवनपट उलगडून दाखविणारी ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली. ही चित्रफीत पाहून सुर्वे यांच्या आठवणींनी रसिक गहिवरले.

कोत्तापल्ले म्हणाले, ‘ मास्तरांची सावली हे आत्मकथन वाचलं पाहिजे ते अक्षरवाङमय म्हणूनच ओळखले जाईल. राहायला घर नाही. उघड्यावर संसार अनाथ म्हणून नारायण सुर्वे जन्माला आले.  शोषित, वंचित, कष्टकऱ्यातुन आलेल्या सुर्वे यांच्या कवितेत आयुष्याचा एक वेगळा गंध आहे. वाचकांच्या सर्वस्तरावर लोकप्रिय झालेल्या त्यांच्या कवितेतून कष्टकरी, कामगार स्त्रिया, देहविक्रय  करणाऱ्या स्त्रिया, यांचे चित्रण आहे. त्यांच्या साहित्यात करुणा हे मूल्य भरून राहिले आहे, हे मूल्य मानवतेला कवेत घेणारं आहे. त्यांच्या साहित्याने माणसातल्या माणूसपणाला साद घातली . सुर्वेंची कवितेने स्त्रीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. जगण्याचा व्यापक अवकाश त्यांच्या कवितेत आहे. त्यांनी कविता सादरीकरणाला वेगळं गांभीर्य प्राप्त करून दिले.  जनसामान्यांच्या  कष्टकऱ्यांच्या वेदनेचे विद्यापीठ म्हणजे नारायण सुर्वे यांची कविता. त्यांच्या साहित्याने जगणं बदलण्याचा विचार दिला. ते मार्क्सवादी होते, मानवतावादाचे दुसरे नाव मार्क्सवाद आहे.

प्रा. जोशी म्हणाले, ‘१९६० नंतरच्या  कवितेचा विचार करताना नारायण सुर्वें यांची कविता एक महत्वाचा टप्पा ठरतो.  त्यांच्या कवितेतून मराठी कवितेत तोवर व्यक्त न झालेले कष्टकऱ्यांचे जग सर्वार्थाने व्यक्त झाले. सुर्वे यांची कविता मार्क्सवादी जाणिवेमुळे मार्क्सवादी विचारांचे सूचन करीत असली तरी प्रचारकी स्वरूप धारण करीत नाही. माणसावरील आणि जीवनावरील निःस्सीम श्रद्धेमुळे सुर्वे यांच्या कवितेतील आशावादी सूर कधीही लोप पावलेला दिसत नाही. प्रासादिकता, बोलीभाषेचा प्रभारी वापर, ओळखीची वाटेल अशी प्रतिमासृष्टी आणि काळजाला भिडणारा आशय यामुळे सुर्वे यांची कविता समाजाच्या सर्व थरातील लोकांच्या अंतःकरणाला भिडली. मानव्याची प्रतिष्ठापना हेच त्यांच्या कवितेचे ब्रीद होते. श्रम आणि चळवळीचा पुरस्कार त्यांच्या कवितेने केला. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.