​चांगला विनोद टवाळीतून नव्हे, खेळकर वृत्तीतून निर्माण होतो : शिवराज गोर्ले

Gorle
पुणे , प्रतिनिधी  : विनोदबुद्धी हेच माणसाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. बाळ रडतं तेव्हा ते जगात येतं, बाळ हसतं तेव्हा ते माणसात येतं. आजकाल हसण्याचा व्यायाम करण्यासाठी लोक ‘हास्यक्लब’ मध्ये जाऊन कृत्रिम हसतात – ते हास्य नसतं, फक्त हास्यध्वनी असतात. खरं हसणं हे आतून यायला हवं – त्यासाठीच चांगल्या विनोदाची गरज असते. विनोदी लिहिणं अवघड असतं कारण विनोद फसला की फजिती होते. चांगला विनोद कुत्सित टवाळीतून नव्हे, बुद्धीतून निर्माण होतो.  असे मत प्रसिद्ध लेखक शिवराज गोर्ले यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित मासिक मनोरंजन’कार’ का. र. मित्र व्याख्यानमालेचे उदघाटन शिवराज गोर्ले यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते ‘विनोदी लिहिताना’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते. 
           गोर्ले म्हणाले, “विनोदाची व्याख्या अशीही केली जाते. आयुष्यातील प्रमाणाचा खेळकर विवेक म्हणजे विनोद. प्रसंगी स्वतःलाही ‘हास्यविषय’ करण्याचा उमदेपणा हवा. विनोद सर्वत्र असतो. अनेकदा सत्य कल्पितापेक्षा विनोदी असते, तो विनोद टिपण्याची खास दृष्टी हवी. उपहास आणि परिहास हे विनोदाचे दोन प्रकार आहेत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, गडकरी यांचा भर उपहासावर होता. चिं. वि. जोशी उपहासाकडून परिहासाकडे वळले. आचार्य अत्रे, पु. ल. यांचा विनोद हा काहीसा ‘थिएट्रिकल′ होता. ‘मुलीचं वळण’ अगदी ‘सरळ′ कसं असू शकतं. यासारख्या पु. लं. च्या कोट्यानी मराठी माणसाला खळखळून हसायला शिकवलं. विनोदी लेखन व विनोदी साहित्य यातही फरक केला जातो विविध पात्रांच्या स्वभावाचे पैलू उलगडत मध्यमवर्गीयांचं जीवन दर्शन घडविणारं चिं. वि. चं लेखन साहित्याच्या पातळीवर अधिक जातं.
           प्रा. जोशी म्हणाले, “विनोद निर्मितीसाठी विषय कधीच कमी पडत नाहीत. आजचा काळ विनोदी लेखनासाठी अनुकूल आहे. पण लेखकांसाठी मात्र प्रतिकूल आहे. कारण जीवनाचा आणि जगण्याचा पोत बदलल्यामुळे लेखनासाठी असंख्य विषय आहेत, पण विनोदी लेखन केल्यानंतर ते कुठे प्रसिद्ध करायचे असा मोठा प्रश्न लेखकांसमोर आहे. विनोदाला वाहिलेले फार थोडे दिवाळीअंक आहेत, पण त्यासाठी वर्षभर थांबावे लागते. त्यातही काही दिवाळी अंकांचे लेखक ठराविक असतात. त्यामुळे गुणवत्ता असूनही अनेक नवोदितांना संधी मिळत नाही. त्यामुळे दर्जेदार विनोद निर्माण होऊनही तो प्रसिद्ध होताना दिसत नाही. सर्वसामान्य वाचकांना विनोद आवडतो. अर्थशास्राच्या भाषेत बोलायचे तर विनोदी साहित्याला भरपूर मागणी आहे. पण पुरवठा अल्प आहे. पुरवठा होणाऱ्या साहित्याचा दर्जा हा चिंतेचा विषय आहे. दीपक करंदीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.